मोई येथे पीएमआरडीएची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

पुणे, दि. १४ जुलै : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे अनधिकृत बांधकामांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त केले. सलग दोन दिवस चाललेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने व्यापक आणि काटेकोर नियोजन केले होते.

या मोहिमेसाठी १,००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, एमएसएफचे जवान आणि सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या समन्वयातून ही कारवाई शांततेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

या कारवाईनंतर पीएमआरडीएने बेकायदेशीर बांधकामांविरोधात कठोर भूमिका कायम असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. नागरिकांनी अनधिकृत पत्राशेड किंवा बेकायदेशीर बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याबाबत महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, “पीएमआरडीएच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर पत्राशेड किंवा अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. अशा प्रकारच्या बांधकामांविरोधातील कारवाई आगामी काळातही अधिक कठोरपणे सुरू राहील.”

See also  कोथरूड मध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद