पुणे | प्रतिनिधी :पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापवणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर केली आहे. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत बालवडकर यांनी, “मोदींच्या नावावर मतं मागणारे चंद्रकांत दादा, आपण कुठे आंबे चोरत आहात?” असा उपरोधिक सवाल उपस्थित केला आहे.
पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाविरोधात टीका, आक्षेपार्ह पोस्टर्स आणि आंदोलनांची चर्चा सुरू असताना राज्यातील वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मौन का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “तुम्हाला कोणीही राजीनामा मागितला नाही, तरी तुम्ही कुठे गायब आहात?” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत “मोदींच्या नावावर फक्त मतं मागायची आणि मोदींची अस्मिता अडचणीत आली की घरात लपून बसायचं, हेच का तुमचं मोदीजींवरील प्रेम?” असा सवालही बालवडकर यांनी केला.
कॉकरोच जनता पार्टीच्या पुण्यात झालेल्या भव्य मोर्चानंतर केलेल्या या पोस्टमुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बालवडकर यांच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सोशल मीडिया पोस्टमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय शाब्दिक संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.















