पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नवीन कार्यकारणी तयार करण्यासाठी दोन निवडणुका पार पडल्या. यामुळे राज्यात आधीच दोन संघटनांचे वाद असताना आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या दोन निवडणुकांमुळे संघटनेत देखील दोन अध्यक्ष तयार झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिव बाळासाहेब लांडगे यांनी जाहीर केलेल्या 16 जुलै 2025 च्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड येथील हनुमंत गावडे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर ललित लांडगे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. यांच्यासह कार्यकारणीची निवड प्रक्रिया कामकाज निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीत पाहण्यात आले.
तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर केलेल्या 27 जुलै 2025 च्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर विजय बराटे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
यामुळे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या दोन अध्यक्ष विराजमान झाले असून खरे अध्यक्ष कोण? आता हा अध्यक्ष पदाच्या कुस्तीचा सामना दोन्ही अध्यक्षांनी चेंज रिपोर्ट दाखल केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात न्याय निवडण्यासाठी रंगणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये दोन संघटना, दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असताना आता एकाच संघटनेचे दोन अध्यक्ष पहायला मिळत आहेत.