पुणे : कीर्तीशक्ती फाऊंडेशन, बाणेर यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या “शिक्षणवारी” अभियानांतर्गत दुर्गम डोंगरपाड्यांवरून ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कातकरी समाजातील होतकरू विद्यार्थिनींना शालेय गणवेशांसाठी मदत करण्यात आली
वारकरी परंपरेतील समता, सेवा आणि सामाजिक समरसता या मूल्यांना जपत, “आज ती शिकेल, तर उद्या ती स्वतःचे आणि संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडवेल,” या प्रेरणादायी संदेशातून मुलींच्या शिक्षणाद्वारे समाज सक्षमीकरणाचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.
सामाजिक समरसता केवळ विचारांत नव्हे, तर कृतीत उतरली पाहिजे, या भावनेतून समाजातील विविध घटकांनी एकत्र येत या अभियानाला उदंड प्रतिसाद दिला. शिक्षण हीच समान संधी निर्माण करणारी सर्वात प्रभावी शक्ती असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतक देणगीदारांचे कीर्तीशक्ती फाऊंडेशन तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या गणवेश मदत वितरण कार्यक्रमास कीर्तीशक्ती फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. कल्याणी टोकेकर, श्री. ब्रिजेश राय तसेच सौ. शिखा नीखरा उपस्थित होते.
















