मुठा खोऱ्याला खानापूर सबस्टेशन किंवा लवासा लाईनवरून वीजपुरवठा द्या; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मुळशी, प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील मुठा विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुठा खोऱ्यातील गावांना खानापूर सबस्टेशन किंवा लवासा येथील वीजवाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणकडे करण्यात आली.

यावेळी आबासाहेब शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित कुडले, नामदेवअप्पा टेमघरे, रामदास गोळे, सरपंच रामचंद्र काळोखे, तानाजी हळंदे, दत्ताभाऊ काळभोर, अरुण वीर, पोपट ववले, विभाग प्रमुख दिलीप मारणे, मुकेश लोयरे, समीर शिंदे, भरत उभे, विजय मारणे, रमेश मोगल आदी उपस्थित होते.

सध्या मुठा विभागाला भरे–उरवडे–मुठा खिंड मार्गे येणाऱ्या एसटी वीजवाहिनीवर अवलंबून राहावे लागते. या मार्गावर कुठेही बिघाड झाल्यास संपूर्ण मुठा खोऱ्याचा वीजपुरवठा अनेक दिवस खंडित होतो. त्यामुळे मुठा, खारवडे, आंदगाव, वांजळे, वातुंडे, भोडे, सिद्धेश्वर, कोळवडे, लव्हर्डे, जातेडे, कोंढुर, माळेगाव, डावजे, कातवडी आदी गावांतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो तसेच महिला व शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. डावजे व कातवडी परिसरातील अनेक वीज खांब व तारा जीर्ण झाल्या असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचीही मागणी करण्यात आली.

या विभागासाठी नवीन एसटी लाईन उभारणीसाठी निधी उपलब्ध असूनही जागेअभावी काम रखडले आहे. बहुली ते मुठा हे अवघे तीन किलोमीटर अंतर आहे. हे काम लवकर कोणी आवश्यक आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून कार्यवाही न झाल्यास आंदोलनाच्या इशारा यावेळी देण्यात आला.

See also  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती!५० पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती