मुळशीतील मुलखेड गावात पहाटे दरोडा; दोन घरांवर हल्ला, ३० तोळे सोने, ३० तोळे चांदी व रोकड लंपास

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुलखेड गावात पहाटेच्या सुमारास झालेल्या धाडसी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी गावातील दोन घरांना लक्ष्य करत सुमारे ३० तोळे सोने, ३० तोळे चांदी आणि हजारो रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरात प्रवेश केला. चोरीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका घरमालकावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत मुलखेड परिसरातील ही दुसरी मोठी चोरी असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांनी गस्त वाढवावी, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि गावात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेमुळे मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस तपासातून आरोपींचा लवकरात लवकर पर्दाफाश होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेवर आंदोलनानंतर औंध परिहार चौक येथील 30 अनधिकृत स्टॉलवर कारवाई