वारजे : पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर यांच्यासमवेत वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शिवणे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी करून नागरी सुविधा, प्रलंबित कामे तसेच विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला.
यावेळी शिवणे ते नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवरील प्रस्तावित पुलाची पाहणी करण्यात आली. सदर पुलाची प्रस्तावित रुंदी २४ मीटर व लांबी सुमारे २७० मीटर असून, पूर्वगणनपत्रकानुसार अंदाजित किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे. नांदेड सिटीच्या बाजूने २४ मीटर रुंदीचा रस्ता विकसित झाला असून, शिवणेच्या बाजूने सध्या १२ मीटर रुंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. तरीही प्रस्तावित 24 मी रुंदीचा रस्ता शिवणे आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलानंतर खडकवासला धरणापर्यंत मुठा नदीवर रुंद पूल उपलब्ध नसल्याने परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने सदर पुलाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रकल्पाची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मा. महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागास दिले.
यावेळी गणपती माथा, बराटे इंडस्ट्रीयल इस्टेट येथील नवीन पुलाचे काम तसेच कचरा साठलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. नियमितपणे कचरा संकलन व उचल करण्यासाठी आवश्यक वाहनांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश वारजे आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आले.
सिंहगड वॉर्डाच्या हद्दीतील देशमुखवाडी रस्ता तयार करणे तसेच रस्त्यावरील चेंबर समपातळीत आणणे याबाबतही पाहणी करण्यात आली. सदर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पथ विभागास देण्यात आले.
NDA च्या वॉटर कॅचमेंट एरियातून मोठ्या प्रमाणात पाणी वसाहतीमध्ये शिरल्यामुळे दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मा. आयुक्तांनी दिले. तसेच NDA संबंधित इतर महत्त्वाच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक नगरसेवक तसेच NDA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले.
समाविष्ट गावांमधील डोअर-टू-डोअर कचरा संकलन तसेच सेकंडरी वाहतुकीसाठी आवश्यक वाहनांची संख्या निश्चित करून त्यानुसार वाहनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. समाविष्ट गावांमधील नागरी समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना देतानाच रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याबाबतही मा. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या पाहणीवेळी मा. सभासद श्रीमती अनुताई इंगळे, मा. सभासद श्री. सुभाष नाणेकर, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. संतोष वारुळे, मा. उपायुक्त (परिमंडळ क्र. ३) श्री. विजयकुमार थोरात, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे, मा. मुख्य अभियंता (पाणी पुरवठा) श्री. नंदकिशोर जगताप, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार, पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















