पुणे : पुणे येत्या ऑगस्ट 22तारखेला पुणे येथे आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ हे खडकवासला विधानसभा मतदारसंघात आले होते. या दौऱ्यादरम्यान खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, यापुढे शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली.
यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा दीप्तीताई चौधरी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्या रेहाना चिस्ती, महिला नेत्या अर्चनाताई शहा, ज्येष्ठ नेते लहू आण्णा निवगुणे यांच्यासह खडकवासला मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेश कोकरे मित्रपरिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलेल्या निवेदनात उमेश कोकरे यांनी म्हटले आहे की, “शरद पवार गटाच्या सतत बदलत राहणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या या धरसोड वृत्तीचा थेट फायदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महायुतीतील इतर पक्षांना मिळत आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच अत्यंत प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घेतो, मात्र युतीमधील मित्रपक्षांच्या अशा धोरणांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.
खडकवासला मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी असून, पक्षाने आता स्वावलंबी होऊन लढण्याची गरज आहे. सातत्याने भूमिका बदलणाऱ्या पक्षासोबत राहण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळावर किंवा अधिक ठामपणे जनतेसमोर जावे,” असा सूर यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आळवला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. स्थानिक पातळीवरील या राजकीय परिस्थितीची आणि कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे खडकवासला मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या राजकीय ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे.
















