विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; मग आंदोलन सुरू का? मुरलीधर मोहोळ यांचा रोहित पवारांना सवाल

पुणे : एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत जवळपास पावणेतीन तास चर्चा करून बहुतांश मागण्यांवर एकमत झाले आहे. असे असताना आंदोलन अद्याप सुरू का आहे, असा सवाल मोहोळ यांनी आमदार रोहित पवार यांना केला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोहोळ म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एस. एम. जोशी पूल, अलका चौक आणि शास्त्री रोड अशा विविध ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मी दोन दिवस प्रवासात असलो, तरी या आंदोलनातील घडामोडींवर माझे लक्ष होते. विद्यार्थ्यांशी माझा वैयक्तिक संपर्क होता. आंदोलन सुरू होण्यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता.”

लोकशाही आणि संविधानाने प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. त्यानंतर रोहित पवार यांनी आणखी एका शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या शिष्टमंडळालाही जवळपास पावणेतीन तास वेळ दिला. या बैठकीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या जवळपास सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली, असे मोहोळ यांनी सांगितले.

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, “एमपीएससीचे अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यांच्या नियुक्ती आणि पदासंदर्भातील निर्णयप्रक्रिया राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांच्या थेट अधिकारात येत नाही. तरीही विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्याचे आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.”

विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रांची मागणी करून होणारा त्रास थांबवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यापुढे विद्यार्थ्यांना अनावश्यक कागदपत्रे आणि सिंगल कार्डसंदर्भातील प्रक्रियेमुळे त्रास होणार नाही, अशी सुलभ व्यवस्था करण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह परीक्षांच्या मुद्द्यावरही राधा समितीच्या माध्यमातून विचार केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

See also  आरोग्य विभागात १७२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरतीची कार्यवाही सुरू

बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित करण्याबाबत समाधान व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यावर प्रतिनिधींच्या सह्याही होत्या. मात्र, पुण्यात परतल्यानंतर आंदोलन थांबण्याऐवजी ते अधिक तीव्र झाले. यावरून मोहोळ यांनी रोहित पवार यांना सवाल केला की, “तुम्हीच पाठवलेल्या शिष्टमंडळाने चर्चेनंतर समाधान व्यक्त केले आणि आंदोलन स्थगित करण्याची भूमिका जाहीर केली. मग त्याच प्रतिनिधींवर तुमचा विश्वास नाही का? आंदोलन पुढे सुरू ठेवण्यामागचे नेमके कारण काय?”

विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा विचार करावा, असे आवाहन करत मोहोळ म्हणाले की, मुख्यमंत्री आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत संवेदनशील आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय वाटचालीत अडथळे येऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.

रोहित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू राहणे योग्य आहे का, याचा विचार करावा, असेही मोहोळ यांनी म्हटले.आंदोलनाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढत्या उपस्थितीवरही त्यांनी टीका केली. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे नेते येऊन भाषणे करत आहेत. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे की राजकीय अधिवेशन, असा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भविष्याचा विचार होणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.पुण्यात लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, त्यांच्या मेहनतीचा आणि भविष्याचा विचार करून आंदोलनाबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत मोहोळ यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.