हिंजवडी : भूमकर चौकात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चालकाला बसमधून धूर येत असल्याचे जाणवले. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवून सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवले. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, आग इतक्या वेगाने पसरली की अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बसेने पूर्ण पेट घेतला होता. काही मिनिटांतच बस जळून खाक झाली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा स्कूल बसच्या फिटनेस आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.















