पुणे, दि. ४ सप्टेंबर : प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे तसेच अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्ष सौ. वैशाली कमाजदार, पार्वती निम्हण यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बाणेर–बालेवाडी–सुस–म्हाळुंगे परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यातच अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. रस्त्यांवरील खड्डे, अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे होणारी कोंडी आणि त्यातून घडणारे अपघात यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन, रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, अवजड वाहनांच्या वाहतुकीवर योग्य नियंत्रण तसेच अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी वैशाली कमाजदार, युवा नेत्या पार्वती निम्हण यांनी केली.
निवेदनाची दखल घेत सुनेत्रा पवार यांनी परिसरातील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांना तातडीने सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले, अशी माहिती वैशाली कमाजदार यांनी दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे, पुणे शहर महिला कार्याध्यक्ष वैशाली कमाजदार पाषाणच्या युवा नेत्या पार्वती निम्हण आणि महिला उपस्थित होत्या.
















