औंध-बाणेर प्रभाग समिती सदस्यपदासाठी १९ सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रिंगणात; तीन जागांसाठी पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणी; भाजपचे वर्चस्व असल्याने नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष

औंध : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधील प्रभाग समिती सदस्यपदासाठी तब्बल १९ सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभाग समितीवर तीन सदस्यांची निवड केली जाणार असल्याने या निवडीकडे परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीमध्ये सध्या भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे समितीमध्ये भाजपचे स्पष्ट वर्चस्व असल्याने तीनही सदस्यपदे भाजपशी संबंधित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, औंध परिसरातील जुन्या पक्ष कार्यकर्त्यांना या पदावर संधी द्यावी, अशी मागणी भाजपमधील काही कार्यकर्त्यांकडून होत आहे. दुसरीकडे, प्रभागातील भौगोलिक समतोल साधण्यासाठी बाणेर-बालेवाडी परिसरातून एक आणि सुस-महाळुंगे परिसरातून एक प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, प्रभाग समितीवरील सदस्यपद हे सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधित्वासाठी असताना या पदासाठी थेट राजकीय कार्यकर्त्यांचा विचार करू नये, अशी भूमिका विविध सामाजिक संस्थांनी घेतली आहे. सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रभाग समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील नागरी समस्या, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होत असल्याने या समितीवर सामाजिक क्षेत्रातील सक्रिय आणि अनुभवी व्यक्तींची नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

१९ इच्छुकांमधून तीन सदस्यांची निवड करताना राजकीय समीकरणांपेक्षा सामाजिक कार्याचा अनुभव, संस्थेचे प्रत्यक्ष काम आणि नागरिकांशी असलेला संपर्क यांना प्राधान्य मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  बंगाली बांधवांचा काली माता पूजा उत्सव उत्साहात सुरू ; श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्षे