अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शिक्षणांची गरज- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुढील वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराची ना. पाटील यांची घोषणा
पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. सांस्कृतिक पैलू  व तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ,पद्मभूषण डाॅ. जे.पी. नाईक यांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास,आरोग्य क्षेत्रातील मुलभूत योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शिक्षक पुरस्कार सुरू करावेत अशी मागणी नाईक साहेबांच्या कार्याचे अभ्यासक असलेले,आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी केली होती, ती मान्य करून हे पुरस्कार सुरू करताना मला विलक्षण आनंद होत आहे,कृतार्थ वाटत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार १४ वर्षांच्या परंपरेनंतर पुन्हा सुरु झाला. पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ना. पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयाचे पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी पुरस्कारासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा विचार केला नसल्याचे सांगितले. पुरस्कार राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या चिठ्ठीवर दिले गेलेले नाहीत, तर केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. पुढील पिढीत चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे,” असे पाटील यांनी नमूद केले.

See also  “सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची काळाची गरज” – डॉ. नंदकिशोर एकबोटे

शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करतात. आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट बदलत्या काळानुसार शिक्षकांवर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे मत यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ डीजेपुरता मर्यादित न राहता त्यातील सांस्कृतिक व धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.

तरुण पिढीमध्ये भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक काम हे गरजेनुसार केले पाहिजे, असे सांगताना पाटील यांनी एकल पालक कुटुंबांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकल पालक योजनेसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. कोथरूड परिसरातील सुमारे ९५० एकल महिलांना समुत्कर्ष ग्राहक पेठेतून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी एकल माता कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता असून, अशा कुटुंबांना व्यापक स्तरावर मदत मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वाचा सहभाग असल्याने त्यांनाही आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ना. पाटील यांच्यामुळे २०१२ मध्ये खंडित झालेली शिक्षक पुरस्काराची परंपरा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली याचा आनंद व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत राज्यातील ४२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, गुणात्मक शिक्षण, शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे.

See also  पुणे जिल्ह्यातील जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे; लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश

पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना अनेक पातळ्यांवर छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय समितीत मान्यवर शिक्षकांचा समावेश होता. कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेतून ४२ नावांची निवड करण्यात आल्याचे देवळाणकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या पुरस्कारामुळे केवळ शिक्षकांचा नव्हे, तर त्यांच्या परिवाराचाही सन्मान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याची भावना डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली. पुरस्काराप्राप्त डॉ. देविदास वायदंडे, अंजली जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कृतज्ञता व्यक्त केली.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्जनशील आणि संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान होत असल्याची भावना पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांनी व्यक्त केली. तसेच, शिक्षक हे सामाजिक नेतृत्व करणारे घटक असून पुरस्कार त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवही निर्माण करतात, अशी भावना पुरस्कार प्राप्त अंजली जोशी यांनी व्यक्त केली.