पाषाण : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाशी जोडत त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोन्मेषी विचार विकसित करण्याच्या उद्देशाने पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लॅबचे उद्घाटन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या मंत्री माधुरीताई मिसाळ तसेच MKCLचे विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्योजक अरुण निम्हण, जय निम्हण, नगरसेविका मयुरीताई कोकाटे, महेंद्र देवी सर, मेजर विवेक सिंग, शरद मंडलिक सर, सुरेश पाटील सर यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
नवीन लॅबचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले रोबोटिक्स व एआय मॉडेल्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्सची निर्मिती, त्यांची कार्यपद्धती आणि दैनंदिन जीवनातील उपयोग अत्यंत आत्मविश्वासाने उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या सादरीकरणातून तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, संघभावना आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडले.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रात्यक्षिकांमधून अधोरेखित केले. एआय आणि रोबोटिक्सचा शिक्षण, आरोग्य, उद्योग, वाहतूक, शेती यांसह विविध क्षेत्रांमध्ये भविष्यातील वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा शाळेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या लॅबमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण, संशोधन आणि निर्मितीच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रात्यक्षिकांचे कौतुक करत त्यांना सतत प्रयोगशील राहण्याचे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याचे आवाहन केले.
‘जिज्ञासेतून प्रयोग, प्रयोगातून नवकल्पना आणि नवकल्पनेतून भविष्याची निर्मिती’ या विचाराला प्रत्यक्ष रूप देणारी ही रोबोटिक्स व एआय लॅब विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि नवोन्मेषी बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

















