कोथरूड : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोथरूड मतदार संघात मोठ्या राजकीय संकटाला सामोरे जावे लागत आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये शहर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली अवघे ७ उमेदवार उभे करण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे.
कोथरूडमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीचा परिणाम थेट अपक्ष उमेदवारी अर्ज आणि पक्षांतरांमध्ये दिसून येत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले, तर काहींनी थेट शिंदे गटाची वाट धरली आहे.
पाषाण परिसरातील शिवसेनेच्या अपक्ष उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला, तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळूनही बाळा धनावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. परिणामी, कोथरूडचा ढासळलेला बालेकिल्ला सांभाळण्याची जबाबदारी आता अवघ्या ६ उमेदवारांवर येऊन ठेपली आहे.
शिवसेनेने पुणे शहरासाठी दोन शहर प्रमुख दिले असले, तरी कोथरूड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या पक्ष आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तळागाळातील शिवसैनिकांना न्याय न मिळाल्याची भावना अधिक तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीत जाणवत आहे.
शिवसैनिकांची वाढती नाराजी, अपक्ष बंडखोरी आणि सातत्याने होणारी पक्षांतरे यामुळे कोथरूडमध्ये शिवसेना ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही नाराजी थांबवण्यासाठी आणि पक्षांतर रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कोणती पावले उचलली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
























