औंध : औंध प्रभाग क्रमांक ८ मधील राजीव गांधी पुलाखालील मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गणेशोत्सव काळात लाखो भाविक याच ठिकाणी भक्तीभावाने श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी येत असतात. मात्र ज्या ठिकाणी विसर्जन करायचे आहे, त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात नदीमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून भाविकांच्या धार्मिक भावनांचाही अवमान होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या संदर्भात पर्यावरण संवर्धन संस्थेने पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.संस्थेचे अध्यक्ष महेंद्र सखाराम कदम, सचिव विकास सातारकर आणि निरीक्षक संदिप शेंडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औंध येथील मुळा नदी पात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात राडा-रोडा पडला असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सध्याच्या पावसाळ्यात थोडा जरी पाऊस आला तरी नदी पात्र तुडुंब भरून वाहत आहे. औंध परिसरात कुठेही काम झाल्यास त्याचा उरलेला राडा-रोडा सदर नदीपात्रात आणून टाकला जात आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पात्राची खोली कमी होत चालली आहे.
त्यातच भर म्हणून औंध परिसरातील बहुतांश सोसायट्यांचे ड्रेनेज व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सरळ नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणी काळ्या रंगाचे आणि उग्र वास असलेले झाले आहे.
नदीतील मासे, बेडूक असे अनेक जीव नाहीसे होण्याची दाट शक्यता असून किनाऱ्यावर थांबून पाहिले असता अनेक जनावरे हेच दूषित पाणी पिताना दिसतात. हा प्रकार पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
गणेशोत्सवात नदीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या वाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि प्रक्रिया न करता पाणी सोडणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
“गणरायाचे विसर्जन जिथे होते तिथेच जर गटाराचे पाणी येत असेल तर हा भक्तीचा आणि पर्यावरणाचा दोन्हीचा अपमान आहे. महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन विसर्जनापूर्वी त्वरीत कार्यवाही करावी.” – महेंद्र कदम, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन संस्था, औंध
घर ताज्या बातम्या मुळा नदी पात्रात सांडपाणी, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे तातडीने दुरुस्तीची मागणी















