पुणे | प्रतिनिधी : औंध येथील लोकमंगल विहार डीपी रोड परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या ईडब्ल्यूएस इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट अवैधरीत्या भाड्याने दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या इमारतीची दुरावस्था झाली असून, अनधिकृत भाडेकरू, इमारतीतील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मनपाच्या मालमत्तेचे भाडे कोण घेत आहे?
महापालिकेच्या मालकीच्या या इमारतीमधील फ्लॅट कोणाच्या परवानगीने भाड्याने देण्यात आले आहेत, तसेच या फ्लॅटचे भाडे कोण स्वीकारत आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनधिकृतरीत्या फ्लॅट भाड्याने देण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
इमारतीतील फ्लॅट भाड्याने देताना महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्ती अथवा महापालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या इमारतीतील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील काही फ्लॅटचा दारू पिण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी वारंवार पोलिसांकडे केल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी या इमारतीत विविध गुन्ह्यांमधील आरोपी आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे.मात्र, या तक्रारींकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने इमारतीमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या तक्रारींची पोलिसांनी दखल घेऊन सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे.
अनधिकृत वीजजोडणीचा आरोप
अवैधरीत्या राहणाऱ्या भाडेकरूंना अनधिकृत विद्युत कनेक्शन पुरवण्यात आले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या वीजजोडण्यांची तपासणी करून नियमबाह्य जोडणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इमारतीची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. इमारतीच्या स्वच्छतेचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, महापालिकेने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने संयुक्त पाहणी करून इमारतीमधील रहिवाशांची माहिती, फ्लॅट भाड्याने देण्याची परवानगी, भाडे वसुलीची प्रक्रिया आणि अनधिकृत वापर याची चौकशी करावी. तसेच इमारतीच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.अनधिकृतरीत्या फ्लॅट भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करून महापालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर थांबवावा. तसेच पोलिसांनी अमली पदार्थ सेवन व इतर अवैध प्रकारांच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मालमत्ता व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त सोमनाथ आढाव म्हणाले, सदर इमारतीचे तातडीने पाहणे करण्यात येईल तसेच कारवाई करण्यात येईल. अवैद्य रीतीने राहणाऱ्या भाडेकरांवर कायदेशीर कारवाई करून फ्लॅट ताब्यात घेण्यात येतील.
महावितरण अधिकारी लोखंडे म्हणाले, अनधिकृत रित्या वीज जोडणी केली असल्यास पाहणी करून तातडीने कारवाई करण्यात येईल.
















