पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे प्रभाग क्रमांक ९ मध्ये एका स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले असताना, याच परिसरातील वाहतूक कोंडी, रखडलेली रस्त्यांची कामे आणि अपघातांच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांची पाहणी करण्यासाठी मात्र अद्याप आले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महाळुंगे रस्त्यावर काही आठवड्यांपूर्वी दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातूनही केली होती.मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. अपघातानंतरही महाळुंगे रस्त्याच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुसमध्येही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
दरम्यान, सुस परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित पर्यायी रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्तीही रखडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या प्रश्नांबाबत वारंवार मागण्या करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना आंदोलने आणि निवेदने देण्याचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. बाणेर-बालेवाडी-सुस-महाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न सभागृहात तसेच नागरिकांच्या आंदोलनांमध्येही उपस्थित करण्यात आला आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी
महाळुंगे रस्त्यावर दोन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आयुक्त स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करतील आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, अद्याप आयुक्तांची पाहणी झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
“प्रभाग क्रमांक ९ मधील कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आयुक्त येऊ शकतात, तर त्याच परिसरातील गंभीर वाहतूक आणि रस्त्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी वेळ का मिळत नाही?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडी, अपूर्ण पर्यायी रस्ते, रस्त्यांची दुरवस्था तसेच रखडलेल्या कामांची आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















