कोथरूडमधील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कारवाईवरून नागरिकांमध्ये असंतोष; कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी आज बैठक; माहिती न देता होणाऱ्या कारवाईवर आक्षेप

कोथरूड : कोथरूड परिसरात सध्या झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईबाबत नागरिकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप होत असून, काही अपात्र झोपडीधारकांना पात्र ठरविण्याच्या प्रक्रियेवरही आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींचा आढावा घेण्यासाठी श्री जयराम सहकारी गृह रचना मर्यादित, केळेवाडी, कोथरूड संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) सायंकाळी ८ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी, पुनर्वसनासंदर्भातील कायदेशीर तरतुदी, सुरू असलेल्या कारवाईची माहिती आणि पात्रता निश्चितीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. विशेषतः नागरिकांना विश्वासात न घेता होत असलेल्या कारवाईबाबत निर्माण झालेला असंतोष आणि अपात्र झोपडीधारकांना पात्र ठरविण्याच्या मुद्द्यावर नागरिकांची भूमिका मांडली जाणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, नागरिकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि कायदेशीर बाबींची योग्य माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस संस्थेचे सर्व सभासद, भागधारक तसेच संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री जयराम सहकारी गृह रचना मर्यादित संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. बैठक शिवशक्ती मित्र मंडळ येथे होणार आहे.

See also  कुरकुंभचा ध्वजामंडप शिवकालीन; फिरंगाई देवी संदर्भातील मोडी लिपीतील अज्ञातपत्रातून आली माहिती समोर