छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मेट्रो स्टेशनखाली दारूचा अड्डा आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप

महाळुंगे : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मेट्रो स्टेशनखालील परिसरात खुलेआम दारू विक्री आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारांमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

या परिसरातून दररोज अनेक महिला, विद्यार्थिनी आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. विशेषतः सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यविक्री, मद्यपान आणि कथित वेश्याव्यवसायाचे प्रकार सुरू असल्याने महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हा परिसर बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित पोलिसांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच परिसरात नियमित गस्त, संशयास्पद हालचालींवर लक्ष आणि महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील काही भागांचा समावेश असल्याने या परिसराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. परिणामी, परिसरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.

महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक ती कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

See also  सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार परताव्याचा लाभ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार सीओईपी प्रशासनाचा निर्णय