स्वरभक्ती’ भक्ती संध्येत भक्तीचे सूर गुंजले; निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्टचा भोसरीत संगीतमय सोहळा

भोसरी : सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संचालित निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट यांच्या वतीने ‘स्वरभक्ती – एक सुरेल भक्ती संध्या’ या विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे उत्साहात करण्यात आले.

सन २०१५ मध्ये बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्टच्या देशभरात २५ शाखा कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड मधील रूपीनगर शाखेत गेल्या एक वर्षापासून संस्थेच्या संगीत प्रशिक्षणाच्या उपक्रमांना सुरुवात झाली असून, अनेक विद्यार्थी नियमितपणे संगीताचे प्रशिक्षण घेत आहेत. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्यामध्ये शिस्त, एकाग्रता आणि भारतीय संगीत परंपरेविषयी आवड निर्माण होत आहे.

‘स्वरभक्ती’ या भक्ती संध्येत विद्यार्थ्यांसह विविध कलाकारांनी गायन आणि वाद्यवृंदाच्या माध्यमातून सुरेल सादरीकरण केले. मधुर स्वर आणि वाद्यांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. संगीताच्या माध्यमातून भक्ती, प्रेम, शांती आणि मानवी मूल्यांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.यावेळी संगीताच्या परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थित श्रद्धाळू, संगीतप्रेमी आणि पालकांनी त्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रमाला निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट, दिल्लीचे प्राचार्य डॉ. विनोद गंधर्व जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संगीत आणि कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

संगीत आणि कलेच्या माध्यमातून आध्यात्मिक चेतना, प्रेम, शांती, सद्भावना आणि मानवी मूल्यांचा प्रसार करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थित श्रद्धाळू आणि संगीतप्रेमींनी ‘स्वरसंध्या’ या विशेष संगीतमय सादरीकरणाचा आनंद घेत विद्यार्थ्यांना मनापासून प्रोत्साहन दिले.

See also  पवना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबत कार्यवाहीला गती देण्यात येणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सेवांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पुणे झोनचे झोनल इंचार्ज अशोक आहुजा यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, विद्यार्थी, पालक तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.