पुणे : मुंढवा येथील जमीन व्यवहाराच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणात “अधिक व्यावसायिक आणि सखोल तपासाची गरज” असल्याचे नमूद करत पुणे पोलिसांना पुढील तपासाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या तपासाचा साप्ताहिक आढावाही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंढवा जमीन व्यवहारातील आरोपी आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेषतः ९९ टक्के हिस्सा असलेल्या व्यक्तीची भूमिका काय आहे आणि त्या व्यक्तीला या व्यवहाराचा लाभ झाला नाही का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल्याचे आम आदमी पार्टीचे विजय कुंभार यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आता पोलीस महासंचालकांनी अधिक व्यावसायिक आणि सखोल तपासाचे निर्देश दिल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
९९ टक्के हिस्सा असलेल्या व्यक्तीची भूमिका तपासण्यात आली आहे का? व्यवहाराचा प्रत्यक्ष फायदा कोणाला झाला? संबंधित सर्व लाभार्थ्यांची चौकशी झाली आहे का? आतापर्यंतच्या तपासात हे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित का राहिले? असे प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केले आहेत.मुंढवा जमीन व्यवहारात ९९ टक्के हिस्सा असलेली व्यक्ती आरोपी नसताना १ टक्के हिस्सा असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर होणारा पुढील तपास व्यवहारातील संबंधित सर्व व्यक्तींच्या भूमिकेचा सखोल आणि सर्वंकष तपास करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आता होणारा तपास निष्पक्ष आणि सर्वंकष होतो का, हे महत्त्वाचे आहे,” असे आम आदमी पार्टीचे विजय कुंभार यांनी माहिती देताना सांगितले.
















