बाणेर-बालेवाडीतील कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका आणि वेलफेअर फेडरेशनची संयुक्त मोहीम

बालेवाडी : बाणेर-बालेवाडी परिसरातील कचरा टाकणे, संकलन आणि वर्गीकरणाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी बालेवाडी वेलफेअर फेडरेशन (BWF) आणि पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाची नुकतीच बैठक झाली. परिसरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिका अधिकारी आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

महापालिकेतर्फे धनश्री जगदाळे (DSI), प्रमोद उकिर्डे (SI) आणि निखिल निकम (SI) उपस्थित होते. तर बालेवाडी वेलफेअर फेडरेशनतर्फे रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, दफेदार सिंह, सचिन पाटील, शैलेश पाटील, वंदना चौधरी, ओमप्रकाश वानखेडे आणि के. एन. पीतांबरन यांनी सहभाग घेतला. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल फेडरेशनतर्फे धनश्री जगदाळे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीलाच साई चौक आणि जकात नाक्याजवळील सर्व्हिस रस्त्यांवर असलेले कचरा संकलन व वर्गीकरण शेड हटविण्याची किंवा अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी फेडरेशनने केली. यावर महापालिका पथकाने सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध ठिकाणांहून संकलित केलेला कचरा थेट प्रक्रिया केंद्रात नेण्याची व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक पातळीवरील कचरा वर्गीकरण केंद्रांची गरज कमी होऊ शकते. मात्र, यासाठी योग्य नियोजन, मोठ्या कॉम्पॅक्टर वाहनांची उपलब्धता आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करावी लागणार असल्याने या प्रक्रियेस काही कालावधी लागू शकतो.

गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात संबंधित सोसायट्यांना लवकरच नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. ज्या सोसायट्यांकडे स्वतःची प्रक्रिया व्यवस्था उपलब्ध नाही, त्या बाह्य सेवा पुरवठादारांच्या मदतीने ही सुविधा उभारण्यासाठी महापालिकेच्या पथकाशी संपर्क साधू शकतात.

फेडरेशनतर्फेही सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. रस्ते, पदपथ, मोकळ्या जागा तसेच सुविधांसाठी राखीव असलेल्या जागांवर अनधिकृतपणे कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन पथकाच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

See also  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सुसमध्ये आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर तसेच शाखांचे उद्घाटन

यावेळी बालेवाडी गावाजवळील करन सेलेस्टा सोसायटीचे उदाहरण देण्यात आले. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कचरा टाकण्याची समस्या होती. मात्र, फेडरेशन, महापालिका पथक आणि सोसायटीच्या समितीने समन्वयाने प्रयत्न केल्यामुळे या समस्येवर प्रभावीपणे उपाययोजना करणे शक्य होत असल्याचे सांगण्यात आले. परिसरातील कचरा टाकण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीच्या शेवटी मोरेश्वर बालवडकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.