पक्षाच्याच नगरसेवकांवर मुख्यमंत्री भडकले

पुणे (विशेष प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड समाधानकारक नसल्याने मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवकांवर चांगलेच भडकले.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी नगरसेवकांची बैठक मुख्य मंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. विकास कामे, पक्षसंघटन याबाबत फडणवीस यांनी झाडाझडती घेतली.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही नगरसेवकांची बैठक घेऊन परफॉर्मन्स सुधारा, अशी जाणीव दिली होती. त्यापाठोपाठ मुख्य मंत्र्यांनी तर अतिशय कडक शब्दांत समाचार घेतला. महापालिकेत सत्तेची पदे मागण्यासाठी माझ्याकडे आलात तर मी त्या संबंधित नगरसेवकाचे रिपोर्ट कार्डच काढेन. प्रभागाच्या, शहराच्या विकासासाठी किती कामे केली? पक्ष संघटनेसाठी किती योगदान दिले? याचा रिपोर्ट सांगेन, अशी धमकीच फडणवीस यांनी दिली.

पक्षाच्या बैठका, पक्षाचे कार्यक्रम, पक्षाचा प्रचार याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी मुख्य मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.  केंद्र आणि राज्य सरकार पुणे शहरासाठी भरभरून मदत देत असताना नगरसेवक मात्र शिथिल आहेत, त्यातून फडणवीस यांचा उद्वेग झाला असावा, असे राजकीय वर्तुळात मानले जाते. मेट्रो, शहराच्या अंतर्गत रिंग रोड, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, पुरंदर विमानतळ, नदी सुधार असे मोठे प्रकल्प फडणवीस यांनी मार्गी लावले आहेत. पुरंदर विमानतळाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन संपादनाचा प्रश्न मार्गी लावून फडणवीस यांना साथ दिली. मात्र, शहरात चर्चा महापालिकेतील बढतीचा घोटाळा, रस्त्यातील खड्डे, नगरसेवकांमधील भांडणे, गटबाजी याचीच चर्चा चालू झाली आणि तेच चित्र पुणेकरांपुढे आले, याचा राग मुख्य मंत्र्यांना आला असावा.  त्रुटी सुधारा आणि कामाला लागा, असा संदेश मुख्य मंत्र्यांनी नगरसेवकांना दिला.

आगामी काळात पुण्यातील मंत्री, आमदार यांचे रिपोर्ट कार्ड मुख्य मंत्री मांडतील, त्यांचा रोख नगरसेवकांप्रमाणे यांच्यावरही असावा, असे मानले जाते.

See also  ग्रामविकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे