वाचन प्रेरणा दिन व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी

पुणे : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे येथे वाचन प्रेरणा दिन तसेच भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांमधून विद्यार्थिनींना मोठी प्रेरणा देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींनी ज्ञानार्जनासाठी वाचनाची सवय जोपासावी आणि डॉ. कलाम यांच्या आदर्शांनुसार जीवनात प्रगती साधावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमात ग्रंथपाल डॉ. विश्वास मोहिते यांनी वाचनाचे महत्त्व विषद करताना नियमित वाचनामुळे ज्ञानवृद्धी, विचारशक्ती, भाषिक कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. वाचन हे केवळ शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुवर्णा चोरगे, डॉ. अविनाश पवार, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थिनींनी नियमित वाचन करण्याची आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

See also  केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे - डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार