पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ३ आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने मौजे सुस येथे अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्यावरील पत्राशेड तसेच तीर्थ टॉवर येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे ३,८०० चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस बंदोबस्तात नियोजित करण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता आणि बांधकाम विभाग झोन क्रमांक ३ चे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत उपअभियंता नितीन साबळे, कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी, संबंधित विभागातील कर्मचारी आणि पोलीस पथक सहभागी झाले होते. कारवाईसाठी दोन जेसीबी, एक गॅस कटर आणि अतिक्रमण विभागातील दहा कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली.
महापालिकेच्या संबंधित विभागांनी संयुक्तपणे ही कारवाई करत सुस परिसरातील अनधिकृत बांधकामे निष्कासित केली. या मोहिमेमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीर्थ टॉवर्स सोसायटी मधील रहिवाशांनी सदर कारवाई ही अन्यायकारक आहे. पुणे महानगरपालिकेने पाठवलेल्या कारवाईच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देण्यात आले होते. परंतु याचा विचार न करता पुणे महानगरपालिकेने कारवाई केली ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.
















