प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे कार्यादेश तातडीने द्या-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी १५ हजार घरकुलांसाठी मंजुरी देण्यात आली असून उर्वरित कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या ५ हजार अर्जांच्या कागदपत्रांची पूर्तता तातडीने करुन कार्यादेश देण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहूल महिवाल, सहआयुक्त स्नेहल बर्गे, माजी आमदार बाळासाहेब भेगडे, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, पात्र लाभार्थ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष घरकुल बांधकाम सुरु केलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण फार कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्रतिनिधी नियुक्त करावा. त्या प्रतिनिधीने त्या तालुक्यातील कामावर लक्ष दिल्यास कामे लवकर होऊन लाभार्थींना वेळेत लाभ मिळेल.असेही ते म्हणाले. नियुक्त संस्था काम करत नसतील तर त्यांच्याकडून कामे काढून घ्यावीत. कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणा वाढवून घरकुलांच्या कामाला गती द्यावी. याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाचा प्रगती अहवाल सादर केला व सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

See also  योगीराज पतसंस्थेचे मदत करणारे हात हे खूप मोठे आहेत : मेधा कुलकर्णी