बाणेर : राज्यात दुष्काळाचे संकट असताना दिवाळीच्या फराळावर होणारा खर्च टाळून त्या रकमेतून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर केशव तापकीर यांनी जाहीर केला. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
योगीराज पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त ठेवीदार, संचालक व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप केले जाते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या खर्चाला फाटा देत गरजू दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, संस्थेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त एक महिन्याचा बोनस, पगारवाढीतील फरक आणि एक लाख रुपयांचा दिवाळी अॅडव्हान्स असे एकूण २९ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. या वेळी तापकीर बोलत होते.
तापकीर म्हणाले, “दुष्काळाचे चटके संपूर्ण राज्याला बसत असताना दिवाळीचा फराळ वाटप करण्यापेक्षा या खर्चातून दुष्काळग्रस्तांना मदत करणे अधिक योग्य वाटते. त्यामुळे यंदा फराळावरील खर्च टाळून त्यातून गरजू नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.” संस्थेच्या वार्षिक सभेप्रसंगी संस्थेकडून व उपस्थितांच्या वतीने जमा झालेला 11 लाख मदत निधीतून दिवाळी नंतर दुष्काळग्रस्तांना योगीराज सोशल फाऊंडेशन मार्फत धान्य वाटप करण्यात येणार आहे.
संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. संस्थेतील शिपायापासून व्यवस्थापकापर्यंत सर्व कर्मचारी वर्षभर प्रामाणिकपणे, वेळेची पर्वा न करता काम करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेची प्रगती होत आहे. सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, त्यांच्या कष्टाचे कौतुक व्हावे आणि त्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने बोनस व इतर लाभांचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधिकारी संपत भोसले, राज्याचे माजी कृषी सहसंचालक सुभाष खेमनर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, किरण लांडगे, देविदास मुरकुटे, विजय विधाते, रामदास विधाते, रविंद्र गायकवाड, संस्थेच्या संचालिका रंजना कोलते, सहयोगी संचालिका निकिता माताडे, माजी संचालक अमर लोंढे, अॅड. अशोक रानवडे, वसंत माळी यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत संस्थेचे तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले व आभार उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.














