पुणे : मुळा रोड वस्ती येथून रेंजहिलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या पावसाळी गटारांच्या चेंबरची झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही चेंबर खचलेले असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चेंबरची झाकणे येत्या दोन दिवसांत दुरुस्त करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. अन्यथा संबंधित कार्यालयासमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा पुणे शहर मनसेचे उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी दिला आहे.
मुळा रोड हा रस्ता जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडत असल्याने तसेच नगर रोडवरून मुळा रोडमार्गे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने येथे वाहनांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत तुटलेल्या व खचलेल्या चेंबरच्या झाकणांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत नागरिकांकडून तक्रारी येत असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.
यासंदर्भात सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे महापालिका आयुक्त, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि पथ विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.सुहास निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश पाटील, विजय बेल्हेकर, प्रणव हुले, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर खुडे, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चेंबरची झाकणे दुरुस्त करावीत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.















