पुणे : बालेवाडी येथील ‘४३ प्रायव्हेट ड्राईव्ह’ या गृहप्रकल्पातील म्हाडा सोडत सप्टेंबर २०२५ अंतर्गत लॉटरीद्वारे सदनिका मिळालेल्या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेला प्रवेश रस्ता अद्याप उपलब्ध झालेला नाही. हा रस्ता तातडीने खुला करावा, अन्यथा संबंधित बांधकाम व्यावसायिक सचिन भंडारी आणि आर्किटेक्ट यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग (झोन-३) येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. म्हाडाच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी प्रवेश रस्त्याच्या उपलब्धतेसाठी वारंवार प्रशासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असतानाही अद्याप रस्ता खुला करण्याबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप काळे यांनी निवेदनात केला आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट यांनी बांधकाम मंजुरीसाठी सादर केलेल्या आराखड्यात दर्शविलेला प्रवेश रस्ता नागरिकांसाठी तातडीने खुला करावा. नियमानुसार रस्ता उपलब्ध करून न दिल्यास संबंधित आर्किटेक्टचे लायसन्स रद्द करावे, तसेच बांधकाम व्यावसायिक सचिन भंडारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात महापालिका प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणीही रविराज काळे यांनी केली आहे. म्हाडाच्या सोडतीत घर मिळूनही प्रवेश रस्त्याअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.















