पुणे : महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माणुसकी फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ महिलांना यावेळी नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार, ज्येष्ठ साहित्य व कलाप्रेमी उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन सेंट्रल कमिटीचे सदस्य डॉ. अनिल माळी, माजी अध्यक्ष डॉ. सुवर्णा माळी, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर, सुरेश धनावडे, सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छायाताई भगत, रसिका भवाळकर, युवराज दिसले, मधुकर्णिका सासवडे, जितेंद्र बाराते, सुवर्णा काणे, निशा पाचोरकर, अशोक जगताप आणि दिलीप कारमपुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले, “देवीच्या विविध रूपांप्रमाणे आजच्या नवदुर्गाही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिलांना प्रत्येक क्षेत्रात मानसन्मान मिळाला पाहिजे. त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आग्रही भूमिका घेतली पाहिजे.”
माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यंदाचा नवदुर्गा पुरस्कार सिनेअभिनेत्री असावरी तारे, राष्ट्रीय जलतरणपटू व गायिका श्रृंगेरी भावसार, श्वेता लिमये, समाजसेविका राखी रासकर आणि जया जोशी, आकांक्षा वाघ, उद्योजिका व ब्युटीशियन मंजुषा देशमुख, आरतीताई करंजावणे तसेच संकटग्रस्त व अन्यायग्रस्त महिलांना आधार देणाऱ्या मानसी चंदगडकर यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्व सन्मानार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि उद्योजकीय क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले, तर रसिका भवाळकर यांनी आभार प्रदर्शन केले. महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणारा आणि नव्या पिढीला सकारात्मक प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.















