पुणे : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञतेचा अनोखा आविष्कार घडवत वन्दे मातरम्च्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वन्दे मातरम्’ दीपप्रज्वलन सोहळ्यात तब्बल ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून पुण्याने जागतिक विक्रमाची नोंद केली. या ऐतिहासिक उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली असून, पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा!’ या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने देशभक्ती, राष्ट्रीय अस्मिता आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याप्रती कृतज्ञतेची भावना अधोरेखित केली.
या सोहळ्याचे दीपप्रज्वलन पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, खासदार श्री. मुरलीधर मोहोळ आणि ब्रिगेडियर तरुणेश यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अभिनव विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या भावपूर्ण गायनाने शनिवारवाड्याचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील संकल्पना, उद्देश आणि महत्त्व विशद केले. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सौ. माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये ब्रिगेडियर तरुणेश (डेप्युटी जीओसी), कर्नल विकास सावळजे (एसएसओ, कॅन्टोन्मेंट) आणि कर्नल श्रीनिवास सातवळेकर (कर्नल व्हेटरन्स) यांचा समावेश होता. तसेच उपस्थित आमदारांचा पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विद्युत मुख्य अभियंता शेकटकर, सांस्कृतिक उपायुक्त टेंगळे, नगरसचिव योगिता भोसले, भवन रचना मुख्य अभियंता बिपीन शिंदे तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
कर्नल राजेशकुमार जिंदाल यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रसेवेचे महत्त्व आणि भारतीय सैन्यदलाचे देशाच्या सुरक्षेसाठी असलेले अमूल्य योगदान अधोरेखित केले. या सोहळ्यातील अत्यंत भावस्पर्शी क्षण म्हणजे देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या ५० वीरमाता आणि वीरपत्नींचा करण्यात आलेला विशेष सन्मान. आपल्या कुटुंबातील वीरांनी राष्ट्रासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत या वीरमाता आणि वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्याने उपस्थितांच्या मनात आदर, अभिमान आणि भावनिक कृतज्ञतेची भावना जागवली.
यानंतर ब्रिगेडियर तरुणेश (डेप्युटी जीओसी), मंत्री सौ. माधुरी मिसाळ, मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणांमधून त्यांनी ‘वन्दे मातरम्’चा गौरवशाली इतिहास, राष्ट्रभक्तीचे महत्त्व आणि भारतीय सैन्यदलाचे देशासाठीचे अतुलनीय योगदान यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ३८ हजार २३३ पणत्यांचे एकाच वेळी करण्यात आलेले भव्य दीपप्रज्वलन! लष्करी बँडच्या देशभक्तिपर सुरांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. नियोजित सहभागींच्या माध्यमातून हजारो पणत्या समन्वयाने प्रज्वलित करण्यात आल्या आणि अवघा शनिवारवाडा दीपप्रकाशाने उजळून निघाला. या अद्भुत दृश्याने उपस्थित पुणेकरांच्या मनात राष्ट्राभिमानाची भावना अधिक दृढ केली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकृत परीक्षक श्री. स्वप्नील डांगरीकर यांनी या विक्रमी उपक्रमाची प्रत्यक्ष पडताळणी व परीक्षण केले. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाल्याची घोषणा केली. या ऐतिहासिक यशाचे प्रतीक म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे आणि महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी स्वीकारले. हा क्षण पुणे शहरासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला.
कार्यक्रमाचा समारोप उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर्नल रवि व वसुंधरा काशीकर यांनी केले. ३८ हजार २३३ दीपांचा लखलखता प्रकाश, ५० वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान आणि ‘वन्दे मातरम्’चा दुमदुमलेला जयघोष! या माध्यमातून पुणे शहराने देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि सैन्यदलाप्रती कृतज्ञतेचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवत इतिहासाच्या पानावर आपल्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद केली.
















