सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर होणार; मात्र रुंदीकरण प्रत्यक्ष की केवळ कागदावर? ; पुणे महापालिका आयुक्तांना नागरिकांकडून धोरणाबाबत स्पष्टता देण्याची मागणी

पुणे : पुणे महापालिकेकडून अस्तित्वात असलेल्या सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण दर्शविण्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच औंधमधील एका रस्त्याबाबत, तर गेल्या आठवड्यात कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील रस्ता रुंदीकरणासंदर्भात प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, या रुंदीकरणाची प्रक्रिया नेमकी काय असणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शहरातील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास केवळ सहा मीटर रस्त्यांमुळे रखडला आहे. रस्त्याच्या कमी रुंदीमुळे इमारतींच्या उंचीवर तसेच चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) वापरावर मर्यादा येत असल्याने बांधकाम व्यावसायिक पुनर्विकासासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक त्रास जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक इमारतींमध्ये लिफ्ट आणि पुरेशा पार्किंगची सुविधा नाही. त्यातच ४० ते ५० वर्षे जुन्या इमारतींची पडझड सुरू झाली असून, पावसाळ्यात गळती आणि दुरुस्तीच्या समस्यांनाही रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन देऊन या निर्णयाबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर दर्शविण्याचा निर्णय केवळ बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यापुरता मर्यादित राहणार आहे की प्रत्यक्ष जागेवरही रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शहरातील इतर सहा मीटर रस्त्यांच्या ठिकाणीही नागरिकांनी किंवा बांधकाम व्यावसायिकांनी मागणी केल्यास अशाच प्रकारचा लाभ मिळणार का, तसेच यासाठी महापालिकेने सरसकट धोरण निश्चित केले आहे का, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

याशिवाय, रुंदीकरणानंतर उभारल्या जाणाऱ्या नव्या बांधकामांमुळे परिसरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पावसाळी वाहिन्या आणि अन्य पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी महापालिकेने काय नियोजन केले आहे, असा सवालही करण्यात आला आहे.

यापूर्वी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या काही निर्देशांमुळे रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समोर आले होते. आता या संदर्भात कोणता बदल झाला आहे का, याचाही खुलासा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

See also  अल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन; स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी महापालिकेने स्पष्ट, पारदर्शक आणि सर्वसमावेशक धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.