पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय कडील प्रभाग क्र. २३ अंतर्गत तपकिरी गल्ली, बुधवार पेठ येथे मार्गावर राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवल्याबद्दल ‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम व्यावसायिकावर २५,०००/- रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई संतोष वारुळे (उप आयुक्त – घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), माधव जगताप (उप आयुक्त – परिमंडळ क्र. ५), आणि तिमय्या जगले (महापालिका सहाय्यक आयुक्त, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय) यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपकिरी गल्ली परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा राडारोडा नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक मार्गावर टाकला जात असल्याची आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २४/११/२०२६ रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने दंडात्मक कारवाई केली.
या धडक कारवाईच्या वेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, चंद्रवदन गायकवाड, आरोग्य निरीक्षक तौसीफ देशपांडे, कृष्णा अवघडे व मोकादम प्रत्यक्ष उपस्थित होते.
पुणे शहरात कुठेही अनधिकृतपणे राडारोडा / कचरा टाकणे, अस्वच्छता करणे किंवा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.














