बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर पीएमआरडीएची CREDAI-Pune सोबत बैठक

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील समन्वय वाढवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयात CREDAI-Pune च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि विकास परवानगी प्रक्रियेशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सन २०१६ ते २०१८ या कालावधीत देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांच्या वेळी जमा करण्यात आलेली सुरक्षा ठेव रक्कम परत करण्याबाबत तसेच यासाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

याशिवाय सर्वसमावेशक गृहनिर्माण (Inclusive Housing) धोरण, सुविधा क्षेत्र (Amenity Space) संदर्भातील विविध मुद्दे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित अडचणींवरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

या बैठकीला पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक दीपक वराडे तसेच CREDAI-Pune चे पदाधिकारी उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत चर्चा करण्यात आल्याने प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पीएमआरडीए आणि बांधकाम क्षेत्रातील संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

See also  नागरी सुविधा उपलब्ध करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही