सिहंगड आणि परिसरात मिळाल्या प्राचीन कालीन मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा-डॉ. नंदकिशोर मते यांचा शोध.

पुणे : ” सिंहगड आणि परिसराच्या इतिहास आणि पुरातत्व च्या संशोधनात मी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. याच विषयावर मी माझा शोधनिबंध, डेक्कन कॉलेजला सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
सिंहगडाचा लिखित उपलब्ध इतिहास हा १४ व्या शतकापर्यंत मागे जातो.इसामी नामक लेखकाने इ.स. १३५० मध्ये लिहिलेल्या फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा ई-हिंद या फार्सी महाकाव्यात मुहम्मद तुघलकाने इ.स.१३२८ मध्ये कुंधीयाना(कोंढाणा)किल्ल्यास वेढा घालुन किल्ला घेतल्याची माहिती आली आहे.
१४ व्या शतकाच्याही मागचा सिंहगड आणि परिसराचा इतिहासाचा शोध घेत असताना, सिंहगडावरील पाण्याची खांबटाकी आणि जवळील एक लेणीच्या अभ्यासातून सातवाहन काळातील मानवाच्या राहिवासाचे पुरावे समोर आले. यावरून सिंहगड आणि परिसरात मानावाचा वावर हा इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे होता हे संशोधन करता आले.


परंतु सातवाहन काळाच्याही मागे, सिंहगडाचे तटबंदी युक्त असे संरक्षणात्मक स्वरूप येण्याअगोदरही या परिसरात प्राचीन मानवाचा वावर असावा, असे माझे गृहीतक होते व त्यादृष्टीने त्याचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न सुरु होता आणि तसे पुरावे मला सिंहगड आणि परिसरात मिळालेही.
सिंहगडावरील देवटाक्याच्या आणि तान्हाजी कड्याच्या परिसरात तसेच कोंढाणपूर-रांझे गावाच्या परिसरातील डोंगर रांगेत मला खडकाच्या पृष्ठभागावर प्राचीन कालीन मानवाने कोरलेली काही रेखाटने मिळाली, उदाहरणार्थ कप मार्क वगैरे.भारतात ‘कप मार्क’ हे रॉक आर्ट मधील सर्वात सुरुवातीचे ज्ञात स्वरूप मानले जाते.ज्याच्या नोंदी भारतातील प्रागैतिहासिक काळातील विविध ठिकाणच्या कातळ शिल्पांच्या संशोधनातून ठेवल्या गेल्या आहेत.हे माहिती असल्याने त्याच्या सर्वप्रकारच्या नोंदी घेऊन, मी या विषयातील अभ्यासक,डेक्कन कॉलेज,पुणे येथून पीएचडी करणारे माझे मित्र सचिन पाटील आणि डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी साबळे सर यांना ही माहिती दिली “– डॉ. नंदकिशोर मते अभ्यासक सचिन पाटील आणि प्रा.साबळे सर यांनी या माहितीचा अभ्यास करून, प्रत्यक्ष या स्थळांना भेटी दिल्या. येथील खडकावरील रेखाटनामध्ये व्होल्व्हा(योनी किंवा शिवपिंड सदृश्य आकृती ), कप मार्क, केंद्रित वर्तुळे, शेपटी असलेले कप इत्यादी कोरलेले आहेत. या साऱ्या रेखाटनांचा अभ्यास करून, त्यांची इतर भागात आढाळणाऱ्या यासारख्या कोरीव रेखाटनाशी तुलना करून, त्याविषयीचे या क्षेत्रातील विद्वानांचे आणि स्वतःचे यापूर्वीचे संशोधन अभ्यासून श्री सचिन पाटील यांनी असे मांडले की,--

“अशा प्रकारच्या आकृती किंवा शिल्प कोरणे हे प्रागैतिहासिक काळातील मानवी उत्क्रांतीच्या एका महत्त्वाच्या टप्पा दर्शवीते. असा काळ की ज्या काळात लिपीचा शोध लागला नव्हता.ज्या खडकावर ही आरेखन कोरलेली आहेत, त्या ठिकाणी काही ठिकाणी ओव्हर लॅपिंग ही झालेले दिसून येते.
अशी रेखाटने ही अमूर्त स्वरूपाची म्हणजे त्यातून निश्चित असा कुठला बोध होत नाही अशा स्वरूपाची आहेत, ज्याला abstract rock art असे संबोधले जाते.ही चिन्हे प्राथमिक दृष्ट्या प्रतिकात्मक मातृपूजेची सुरुवात, प्रजनन, जन्म-मृत्यू, शेती, वातावरणातील बदल,अवकाश निरीक्षण व पाणी साठवणूक ह्या उद्देशाने केली गेली असावीत अशी या क्षेत्रातील विद्वानांची मते आहेत.
रॉक आर्ट ही संकल्पना भारतीय उपखंडामध्ये बरेच ठिकाणी वापरली जाते.गुहांमध्ये चित्रित केलेले अंकन हे सुद्धा रॉक आर्टचाच एक प्रकार म्हणून ओळखले जातात. रॉक पेंटिंग आणि रॉक इंग्रविंग हे रॉक आर्टचे मुख्य दोन भाग आहेत. आता रॉक इंग्रविंग मध्ये परत दोन प्रकार पडतात ज्या ऑर्नामेंटल रॉक आर्ट व दुसरा म्हणजे एब्स्ट्रॅक्ट रॉक आर्ट. कोकणामध्ये सापडणारे कातळ शिल्पे ही ऑर्नामेंटल रॉक आर्ट किंवा फिगरेटिव्ह या प्रकारात मोडतात.दख्खनच्या पठारावरती सापडणारी काही कातळ शिल्पे यास आबस्ट्रॅक्ट रॉक आर्ट असे म्हणतात.मराठी मध्ये त्याला अमूर्त स्वरूपाची कातळ शिल्पे असे म्हणतात. मुळात ह्या आकृत्या अर्थहीन,ज्याचा अर्थ लावणे तितकासा सोपा नसतो. उदाहरणार्थ कप मार्क, जॉईंटेड कप, रफिंग लिंक्स, कप वीथ टेल, जॉईंटेड टेल्स, कप विथ लेडर असे अनेक नाम धारण केलेले आकृत्या आहेत. या गोष्टींचा गेली चार वर्षापासून सविस्तरपणे अभ्यास संशोधन करत आहे. तसेच अमूर्त स्वरूपातील शिल्पांचे साम्य असणाऱ्या आकृत्या युरोपीय प्रदेशातील नॉर्थ अंबरलँड,स्कॉटलंड, स्वीडन, ग्रेट ब्रिटनचा उत्तरेकडील भाग,ज्याला आपण अटलांटिक युरोप म्हणतो या परिसरात पाहायला मिळतात. तसेच या विषयावरती जगभरामध्ये अनेक ठिकाणी संशोधन झालेली आहेत”. -सचिन पाटील (रिसर्च स्कॉलर, डेक्कन कॉलेज,पुणे ) "अशाप्रकारच्या खडकावर कोरलेली शिल्प महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळतात. दख्खनच्या पठारावरील प्राचीन व्यापारी मार्गाच्या आसपासच्या बॅसाल्ट खडकावर अशा आकृत्या कोरण्यासाठी लहान,टोकदार दगडी हत्यारांचा वापर केला गेला आहे. आपल्या अधिवासाच्या काळात मानवाने, आपल्या मनातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी ही रेखाटने कोरलेली असावीत.त्यामुळे हा कालखंड विविध ठिकाणी मध्याश्म युगापासून सुरु होऊन अगदी महापाषाण युगापर्यंत त्याच्यात भर पडत गेल्याचे दिसून येते"- डॉ. पी. डी. साबळे ( पुरातत्व विभाग प्रमुख,डेक्कन कॉलेज, पुणे )

“यावरून आता सिंहगड आणि परिसरात प्रागैतिहासिक कालीन मानवाचा अधिवास होता असे दिसून येते.प्रागैतिहासिक काळाचे विविध टप्पे येतात.नेमक्या कोणत्या टप्प्यात ही अमूर्त शिल्प कोरली गेली आहेत, हे मात्र निश्चित सांगता येत नाही.याविषयावर अधिक संशोधन सुरु असून भविष्यात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या संशोधनाचा शोधनिबंध आम्ही एका आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिका मध्ये प्रकाशित करण्यासाठी दिलेला असून, त्यांनी तो स्वीकारला आहे.लवकरच तो प्रकाशित झाल्यावर अभ्यासकांसमोर मांडता येईल” -डॉ. नंदकिशोर मते.

See also  हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईनची सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी मंगळवार पासून काम सुरू करणार