खडकवासला मतदार संघात तीन वाजेपर्यंत 40 टक्के मतदान

खडकवासलाः खडकवासला मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले. तथापि मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढणार हे निश्चित झाली आहे. वाढणाऱ्या टक्क्याचा फायदा कोणाला होणार याकडे आता लक्ष लागले आहे.
खडकवासला मतदारसंघात पाच लाख 76 हजार 505 मतदार आहेत. पैकी  दोन लाख 32 हजार 929 इतक्या मतदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर 507 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

महिला (pink)मतदान केंद्र
मतदानातील महिलांचा टक्का वाढवण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील शिवसागर सोसायटी क्लब हाऊस हॉल महिला मतदान केंद्र आहे. येथील सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी महिला आहेत. येथील मतदान संख्या1102 आहे.

दिव्यांग मतदान केंद्र
नांदेड सिटी येथील नांदेड पब्लिक स्कूल मध्ये खास दिव्यांगांसाठी मतदान केंद्र करण्यात आले होते दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक असलेल्या केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर आणि मदतनीसाची  सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना सहजपणे मतदान करता यावे हा या मागचा उद्देश असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख डॉ. यशवंत माने यांनी सांगितले. या मतदान केंद्रामध्ये दिव्यांग कर्मचारी सुद्धा कर्तव्यावर आहेत. येथील मतदारांची संख्या 718 एवढी आहे.
युवा मतदार केंद्र
युवा मतदारांचा मतदानात सहभाग वाढवण्यासाठी बहुली येथे युवा मतदान केंद्र करण्यात आले आहे. येथील अधिकारी कर्मचारी युवा आहेत एकूण मतदारांची संख्या 733 एवढी आहे

युनिक मतदान केंद्र
डोणजे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत युनिक मतदान केंद्र करण्यात आले आहे. या केंद्रातील मतदान संख्या 1486 एवढी आहे. कोंढवे धावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पारंपारिक संस्कृती पाळणाऱ्या महिलांसाठी गोपनीय आणि सुरक्षित वातावरणात मतदान करण्याची सुविधा दिली आहे तेथील मतदारसंख्या 1414 आहे.

आदर्श मतदान केंद्र
वडगाव बुद्रुक कम्युनिटी हॉल हे  आदर्श मतदान केंद्र केले आहे. हे केंद्र प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान आणि पूर्ण सुविधांनी सज्ज आहे. तेथील मतदार संख्या 1280  आहे.

See also  प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात