स्वच्छ ऊर्जा, सर्वांगीण आरोग्य व लोकाभिमुख विज्ञानावर भर
विज्ञान भारती, ‘इनसा’ व ‘आयआयटीएम’ यांच्यातर्फे ‘सायन्स-२०’ अंतर्गत आयोजित परिसंवादात वैज्ञानिकांचा सूर

पुणे : “भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेत ‘सायन्स-२०’ च्या पाच बैठका झाल्या. विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट्य गाठण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उहापोह केला. चांगल्या भवितव्यासाठी स्वच्छ ऊर्जा, वैश्विक स्तरावर सर्वांगीण आरोग्य आणि लोकाभिमुख विज्ञान-तंत्रज्ञान संस्कृती विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे,” असा सूर वैज्ञानिकांच्या परिसंवादात उमटला.

विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र विभाग, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी-इनसा) आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी-आयआयटीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स २०’ बैठकीतील चर्चांवर आधारित परिसंवादाचे मंगळवारी आयोजन केले होते. ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व इनोव्हेशनला पोषक वातावरणनिर्मिती’ अशी या परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना होती. या निमित्ताने विविध संशोधन संस्थातील वैज्ञानिक एकाच व्यासपीठावर आले होते.

पाषाण रस्त्यावरील आयआयटीएम संस्थेत झालेल्या परिसंवादाच्या उद्घाटनावेळी नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती व ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. आशुतोष शर्मा (दोघेही ऑनलाईन) विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीचे संचालक डॉ. आर. कृष्णन, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे डॉ. अरविंद रानडे, इंडियन नॅशनल सायन्सचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रजेश पांडे, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, सचिव डॉ. मानसी माळगावकर आदी उपस्थित होते. पदवी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी, फॅकल्टी सदस्य, संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने या परिसंवादात उपस्थित होते.

डॉ. शेखर मांडे म्हणाले, “वसुधैव कुटुंबकम हा विचार घेऊन भारताने यशस्वीरीत्या जी-२० चे आयोजन केले. विकासाच्या दृष्टीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्व यासंदर्भात ‘सायन्स-२०’ अंतर्गत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने शाश्वत विकास आणि त्यात तंत्रज्ञानाचे योगदान यावर उहापोह झाला. या चर्चेतून अनेक प्रस्ताव मांडण्यात आले असून, आगामी काळात त्यावर काम होईल. तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, हेही यामध्ये अधोरेखित झाले आहे.”

डॉ. आशुतोष शर्मा म्हणाले, “मानवकेंद्री तंत्रज्ञान विकसित करायला हवे. आरोग्य सुविधा चांगल्या व सुरक्षित व्हाव्यात. बाह्य व आंतरिक स्वास्थ्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी अक्षय, हरित ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवणे गरजेचे आहे. वैविध्यपूर्ण, दर्जेदार आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला शाश्वत विकास साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे.”

डॉ. अरविंद रानडे म्हणाले, “तंत्रज्ञान जसे मानवासाठी वरदान ठरले आहे, तसेच त्यामुळे काही आव्हाने देखील निर्माण झाली आहेत. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. लिंग चाचणी, पृथ्वीचा होत असलेला ऱ्हास, अणुऊर्जेचा दबावतंत्रासाठी होणारा वापर अशी काही आव्हाने आहेत. त्यावरही आगामी काळात चर्चा होणे गरजेचे आहे.”

दुसऱ्या ‘वैश्विक सर्वांगीण आरोग्य’ विषयावर सत्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर श्री धूतपापेश्वरचे व्यवस्थापकीय संचालक रणजित पुराणिक यांनी विचार मांडले.

‘हरित भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा’ या सत्रात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक डॉ. आशिष लेले, ग्राम ऊर्जा सोल्युशनचे सहसंस्थापक डॉ. प्रसाद कुलकर्णी, भौतिक शास्त्राचे अभ्यासक डॉ. संजय ढोले व आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर यांनी ऊर्जेचा वापर, ऊर्जेचे शाश्वत पर्याय याविषयी चर्चा केली.

‘समाज व संस्कृतीसाठी विज्ञान’ या सत्रात डेक्कन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे डॉ. अरविंद रानडे, व आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सहज, सोप्या भाषेत विज्ञान लोकांपर्यंत पोहोचावे, तसेच विज्ञान-तंत्रज्ञान हे लोकांच्या हितासाठी असावे, अशा स्वरूपाची मांडणी केली.

डॉ. विजय भटकर यांनी ऑनलाईन संदेशाद्वारे विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात चांगले काम होत असून, आगामी काळात लोकाभिमुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर अधिक भर द्यायला हवा. ‘सायन्स-२०’मधून आलेल्या सुचना व प्रस्ताव याचा यासाठी उपयोग होईल, अशी अशा व्यक्त केली.

विज्ञान भारती प्रकाशित ‘सृष्टीज्ञान’ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, गुजरात येथे होऊ घातलेल्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत परिसंवादाचा समारोप झाला. चैतन्य गिरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश शौचे यांनी आभार मानले.

See also  नागरिकांनी लोकसेवा हक्क कायद्याचा वापर करून लाभ घ्यावा-आयुक्त दिलीप शिंदे