संत गोरा कुंभार हायस्कूल पाषाण शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे शालेय शिक्षण अवर सचिव यांचे आदेश

पाषाण : नेहरू शिक्षण संस्थेच्या संत गोरा कुंभार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाषाण विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण सांगत संस्था चालकांनी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता परंतु या विरोधात ग्रामस्थांनी तसेच शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अवर सचिव आ.रा. राजपूत यांनी संबंधित प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण संचालक पुणे यांना दिले.

नेहरू शिक्षण संस्थेच्या पाषाण, निमोणे व पिंपरी चिंचवड येथील शाळा संस्थेच्या अनियमित कारभारामुळे बंद झाल्या यामुळे या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अनेक विद्यार्थ्यांना गावापासून दूरच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. असे असताना शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील याबाबत दखल घेण्यात आली नव्हती. याउलट आत्तापर्यंतच्या सर्व शिक्षण संचालकांनी संस्था चालकांच्या बाजूने शाळा बंद करण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावल्याने शाळा बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली.

याला विरोध म्हणून पाषाण पिंपरी चिंचवड निमोणे गावातील ग्रामस्थ मुलांच्या शिक्षणासाठी संस्था चालकांच्या विरोधात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अवर सचिव यांना तक्रार दिली होती. या तक्रारीचे दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अवर सचिव राजपूत यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची आदेश शिक्षण संचालक यांना दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात तसेच शाळांमध्ये सुरू करण्यात आलेले व्यापारी गाळे बंद करण्यात यावेत. व शाळा बंद करण्यासाठी शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  बालेवाडी परिसरामध्ये रात्रीच्या अंधारात विनापरवाना रस्ता खोदकाम करून बुडवला जातोय पालिकेचा कोट्यावधीचा महसूल