नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलन कार्यात उस्फुर्तपणे सहभाग घ्यावा-अपर जिल्हाधिकारी अजय मोरे

पुणे, दि. ७: देशाच्या सिमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता प्रकट करून सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात शासकीय कार्यालयासह दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, उद्योगसंस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उस्फुर्तपणे योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) युवराज मोहिते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स. दै. हंगे (निवृत्त), कर्नल समीर कुलकर्णी (निवृत्त) आदी उपस्थित होते.

श्री. मोरे म्हणाले, आपल्या देशाची सीमा सुरक्षित आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातील सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. सैनिकांनी देशासाठी दिलेल्या सेवेमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे देशाचे अस्तित्व आहे. महसूल विभागाच्यावतीने सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याला प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहील.

सैनिकांचा त्याग आणि कर्तुत्वाची जाणीव सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. ध्वजदिन निधी हा माजी सैनिक, विधवा, वारस, माजी सैनिकांचे पाल्य यांच्या कल्याणासाठी खर्च होत असल्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त निधी संकलन करण्यात यावे. ध्वजदिन निधीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविकात ले. कर्नल हंगे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२२ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी १ कोटी ७४ लाख ५७ हजार ८५२ रुपये इतके उद्दिष्ट साध्य करण्यात असून त्याचे प्रमाण एकूण ६७ टक्के आहे. सन २०२२-२३मध्ये ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, मुली यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजनांसाठी १ कोटी ६ लाख २७ हजार ९३८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. सैनिकी मुलांच्या व मुलींचे वसतिगृहासाठी ७६ लाख ६३ हजार ८५८ रुपये खर्च करण्यात आले आहे.

दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या ८० विधवांना ४२ लाख १० हजार रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजना राबविण्यात येतात. शासकीय नोकरीत माजी सैनिकांना १५ टक्के आरक्षण आहे. विधवांच्या मुलांना मोफत वसतीगृह सुविधा पुरविण्यात येते. ध्वजदिन निधी माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठीच खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनीदेखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात गेल्यावर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करुन धनादेश वितरण करण्यात आले.

See also  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवादजाणून घेतल्या अपेक्षा व संकल्पना