हडपसर : हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथील पुणे महानगरपालिकेच्या शहीद हेमंत करकरे उद्यानामध्ये पुणे महानगरपालिकेचे मॅटर्निटी होम चे आरक्षण जागा बदल करून उद्यानामध्ये घेण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे याला माजी नगरसेवक योगेश ससाने तसेच गोंधळेनगर व सातववाडी परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनींचा ,वृक्षप्रेमींचा ,पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे .
सदर उद्यानालगत सुमारे 30 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र पाटबंधारे खात्याचे मोकळे व पडजमीन असून सदर ठिकाणी फक्त राडाराडा टाकलेला आहे . वास्तविक पाहता मॅटर्निटीहोम च्या आरक्षणाची १५ गुंठे जागा ही त्या उर्वरीत ३० गुंठे मोकळ्या जागेमध्ये बांधकाम करून मॅटर्निटी होम बांधू शकत असतानाही मनपा आयुक्तांची दिशाभूल करून चुकीचे अभिप्राय घेऊन प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरून जागा बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला निदर्शनास येत आहे. खरं तर उद्यान ही शहराची फुफ्फुसे आहेत . पाटबंधारे खात्याकडून वनीकरणाच्या नावाखाली मिळवलेली जागा व त्यावर विकसित केलेले शहीद हेमंत करकरे उद्यान हे हजारो नागरिकांसाठी सकाळ- संध्याकाळ चालण्यासाठी व व्यायामासाठी तसेच लहान मुलांना या ठिकाणी असणाऱ्या खेळण्यांमध्ये खेळण्यासाठी येत असतात. परंतु उद्यानाशेजारील मोकळी जागा तशीच ठेवून करकरे उद्यानाचा लचका तोडण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतले जात आहे.
सदर जागा बदल स्वतः आयुक्तांनी जागेवरती येऊन शहानिशा करून रद्द करावी व मोकळ्या जागेमध्येच मॅटर्निटी होम साठी लागणारी १५ गुंठे जागा तसेच धोबीघाट साठी आरक्षित असणारी ५.५ गुंठे जागा उर्वरित मोकळ्या जागेमध्ये विकसित करावेत व शहीद हेंमत करकरे उद्यानातील जागा बदल केलेला दवाखान्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा अशी मागणी माजी नगरसेवक योगेश दत्तात्रय ससाने यांनी केली आहे.