पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांकडून सुशिक्षित नेतृत्वाला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. उच्च शिक्षित, तंत्रज्ञानाची जाण असलेला आणि आधुनिक विचारांचा उमेदवार म्हणून जयेश मुरकुटे यांना आयटी क्षेत्रातील मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस आणि सुतारवाडी या भागात मोठ्या प्रमाणात आयटी हब विकसित झाला असून हजारो तरुण–तरुणी विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. या वर्गाला मूलभूत सुविधांबरोबरच नियोजनबद्ध पायाभूत विकास, वाहतूक कोंडीवर उपाय, डिजिटल गव्हर्नन्स आणि पारदर्शक कारभार अपेक्षित आहे. या सर्व गरजा समजून घेऊ शकणारे सक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून मुरकुटे यांच्याकडे पाहिले जात आहे.
अनेक आयटी प्रोफेशनल्सशी संवाद साधला असता “शहराच्या निर्णयप्रक्रियेत शिकलेला माणूस असणे गरजेचे आहे” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कॉर्पोरेट कार्यपद्धतीचा अनुभव, सामाजिक प्रश्नांची समज आणि धोरणात्मक दृष्टिकोन यामुळे जयेश मुरकुटे हे आमचे योग्य प्रतिनिधी ठरू शकतात, असे मत या सुशिक्षित मतदारांनी मांडले.
प्रभागातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे जयेश मुरकुटे यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. आधुनिक पुण्याच्या विकासासाठी तंत्रज्ञानस्नेही आणि अभ्यासू नेतृत्व हवे असल्याचा संदेश या माध्यमातून अधोरेखित होत असून प्रभाग क्रमांक नऊमध्ये सुशिक्षित मतदारांचा कौल जयेश मुरकुटे यांच्या पारड्यात झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
























