येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेत बदल

पुणे : येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूक व्यवस्थेत बदलाबाबतचे तात्पुरते आदेश आणि पार्किंग व्यवस्थेत बदलाच्या अनुषंगाने अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत.

वाहतुकीबाबतच्या तात्पुरत्या आदेशानुसार शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री हॉस्पिटल लेन येथून बदामी चौक, जुना एअर पोर्ट रोडकडे व एअरपोर्ट रोडवरील बदामी चौक येथून सह्याद्री हॉस्पिटल लेन मार्गे नगर रस्त्याकडे जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी आली आहे. याऐवजी पर्यायी रस्ता म्हणून शास्त्रीनगर चौक सरळ गोल्फ चौक, उजवीकडे वळून एअरपोर्ट रोडने बदामी चौकाकडून पुढे इच्छितस्थळी जाता येईल. तसेच बदामी चौक सरळ गोल्प क्लब चौक डावीकडे वळण घेवून शास्त्री नगर चौकातून पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी रस्ता सुरू आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २५ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात याव्यात.

नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करुन वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

तसेच सेंट मेरीज पब्लिक स्कूलच्या समोरील रस्त्यावर इन गेटच्या उजव्या बाजुस १५ मीटर व आऊट गेटच्या डाव्या बाजुस १५ मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात आल्याचे अंतिम आदेशही जारी करण्यात आले आहेत. याठिकाणी यापूर्वी जड वाहतूकीबाबत असलेले निर्बंध रद्द करण्यात आले असल्याचेही कळविण्यात आले आहे.

See also  महापालिकेकडून नवले पूल ते सिंहगड रोड वर अतिक्रमणावर हातोडा