गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे खरंच पुण्याकडे लक्ष आहे का?- आम आदमी पार्टी

पुणे : पुणे शहरातील नागरिकांनी 2019 मध्ये भाजपला सहा आमदार व एक खासदार दिला. त्यातील एक आमदाराला (चंद्रकांतदादा पाटील) सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद देखील मिळाले आहे, तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही भाजपचे आमदार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असून देखील पुण्यातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याचा प्रत्यय आपल्याला पुणेकर नागरिक म्हणून मागील दोन वर्षापासून वारंवार घेत आहे. पुण्यात मागील काही दिवसांमध्ये कात्रज तसेच धनकवडी या भागात कोयता गॅंग ची दहशत पसरवण्याची गोष्ट असो किंवा सदाशिव पेठेत भर दुपारी मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याची घडलेली घटना असो तसेच कालच येरवडा परिसरात काही तरुणांनी शस्त्र नाचवत नागरिकांच्या गाड्या फोडल्या व दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. अशा घटना वारंवार घडत असताना पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे का असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचे खरंच पुण्याकडे लक्ष आहे का? हे नेते केवळ राजकीय खेळीत गुंतल्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले हे पुणेकरांना त्यांनी सांगावे. तसेच पुण्याचे पोलीस कमिशनर हे यापुढे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कसे पार पाडणार आहेत? त्याची स्पष्टता त्यांनी नागरिकांना द्यायला हवी. तसेच जे पोलीस कर्मचारी आपापल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यास कमी पडत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. *चंदन नगर परिसरात झालेल्या घटनेचे उदाहरण पाहता तेथील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून अशा प्रकारच्या निष्काळजी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी आम आदमी पक्ष मागणी करत आहे.*

एखादा नागरिक पोलीस चौकीत FIR देण्यासाठी गेल्यास त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. FIR नोंदवून न घेणे, FIR देण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास पोलीस चौकीत बसवून ठेवणे, दखलपात्र गुन्हा असून देखील केवळ अदखलपात्र म्हणून त्याची नोंद करून घेणे अशा अनेक गोष्टींमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जायचे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे. पोलीस कर्मचारी हे खरंच नागरिकांच्या सेवेसाठी आहेत का? की केवळ पुढार्‍यांच्या आणि राजकीय व्यक्तींच्या दावणीला बांधले गेले आहेत? असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागल्याने कायदा व सुव्यवस्थेवरील त्यांचा विश्वास कमी होऊ लागला आहे.

पोलिसांनी जास्तीत जास्त नागरिकांना सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे, आणि यासाठी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पोलीस आयुक्त हे जर ही परिस्थिती बदलू शकणार नसतील तर त्यांनी तात्काळ त्यांचे राजीनामे देऊन पदावरून पाय उत्तर व्हावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर ,सुरेखा भोसले , अमित मस्के , किरण काद्रे , सतीश यादव, अक्षय शिंदे, कनिष्क जाधव, अमोल काळे ,
निरंजन अडागळे, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

See also  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत गतिमानता पंधरवड्याचे ३० डिसेंबरपर्यंत आयोजन