‘एनएसएफडीसी’च्या शिष्टमंडळाची बार्टी संस्थेस भेट

पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली.

शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार जेनेव, मुख्य महाव्यवस्थापक सी. रमेश राव, चर्मोद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा एनएसएफडीसीचे सदस्य धम्मज्योती गजभिये यांचा समावेश होता.

बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भारताचे संविधान, ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. श्री. गजभिये यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बार्टीच्यावतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

त्यांनी श्री. वारे यांनी शिष्टमंडळास बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये बार्टीतर्फे भारताचे संविधान, महापुरुषांच्या जीवनावरील पुस्तकांचे अल्प दरात वितरण, कौशल्य विकास, युपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस परीक्षांचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ देशातील अनुसूचित जातीच्या विकासासाठी महामंडळांना निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असल्याचे सांगून श्री. जेनेव म्हणाले, महामंडळ कौशल्य विकास प्रशिक्षण, फेलोशिप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन आदी क्षेत्रात देशभर कार्य करत आहे. बार्टी ही अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असल्याचे सांगून त्यांनी बार्टीच्या कामांची प्रशंसा केली. बार्टीसारख्या संस्था देशातील अन्य राज्यात उभारण्यात याव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री.गजभिये म्हणाले, अनुसूचित जातीच्या प्रत्येक प्रश्नावर काम करण्याची क्षमता बार्टी संस्थेमध्ये आहे. बार्टी संस्थेचा महासंचालक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने एनएसएफडीसीचा सदस्य म्हणून बार्टी संस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

एनएसएफडीसी आणि बार्टी लवकरच एकत्रितपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिष्टमंडळाने बार्टी ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विभागप्रमुख रविन्द्र कदम, वृषाली शिंदे, शुभांगी पाटील यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन