डोणजे गावात बैलगाडीतून गुलालाची उधळण करत सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष

खडकवासला: बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघात सिंहगड पायथ्याच्या डोणजे गावात सुप्रिया सुळे यांचा विजयाचा जल्लोष  माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या वतीने बैलगाडीतून गुलालाची उधळण करत गावकऱ्यांची  मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.
यावेळी गुलाबराव नानगुडे, अमोल चव्हाण, संभाजी वाल्हेकर, मारुती कंक, केतन जावळकर, सौरभ कांबळे, शंकर चव्हाण, बाळासाहेब पायगुडे, गणेश पारगे, निखिल पायगुडे, उमेश पायगुडे, महेश पारगे, संतोष पायगुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नणंद भावजय यांच्यातील असलेल्या या निवडणुकीत कोण विजयी होणार म्हणून ही लढत चुरशीची ठरली होती. महायुतीने संपूर्ण ताकद या मतदारसंघात पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनीही निवडून येण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात पिंजून काढला होता . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची दखल घेत सुनेत्रा पवार यांना विजयाची आशा होती.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा  मतदार संघांपैकी खडकवासल्याची मतदार संख्या सर्वात जास्त  म्हणजे ५ लाख ३४ हजार  आहे. त्यापैकी 40 टक्के मतदान झाले होते त्यामुळे खडकवासला
विधानसभा मतदार संघातील मतदानावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

तोडफोडीच्या राजकारणाला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्थिर सरकार साठीच मतदारांनी दिलेला कौल आहे.
नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, डोणजे.

मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुती म्हणून बारामती मतदारसंघातून भरपूर प्रयत्न केले परंतु मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे.
दत्तात्रय कोल्हे ,  भाजपा सचिव सतंघटक पश्चिम महाराष्ट्र

भाजपचे संघटक सचिव दत्तात्रय कोल्हे यांनी कोल्हेवाडी येथे निवडणुकीचे विश्लेषण  नागरिकांना पाहता यावे यासाठी मोठी एलईडी स्क्रीन लावली होती. तसेच विजयानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी डीजेची व्यवस्था ही केली होती. परंतु जसजसा  निकालात सुनेत्रा पवार पिछाडीवर जाऊ लागल्या तसतसे आवरते घेत एलईडी स्क्रीन बंद करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांना स्थिर सरकार ची अपेक्षा असते तोडफोड आणि अभद्र  युतीला कंटाळल्या नागरिकांनी मतदानातून आपले जनमत व्यक्त केले आहे.
पुनम मते, अध्यक्ष महिला आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार  गट,  खडकवासला विधानसभा

तोडफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या नागरिकांनी एकजुटीने विजय मिळवला आहे. शरद पवार साहेबांचा  पराभव हेच आमचे ध्येय असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे जनमानसात भावना तीव्र होत्या. त्यामुळे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती.
त्रिंबक मोकाशी, अध्यक्ष, खडकवासला विधानसभा, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट

See also  विशाल दिलीप बालवडकर यांची वनाधिकारी पदी नियुक्ती बद्दल ग्रामस्थांकडून सत्कार