पुणे : प्रा फाउंडेशन संचालित विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्रातील विशेष मुलांची ने आण करणे सुलभ व्हावे व त्यांना त्यांच्या व्हील चेयर सह मोठ्या वाहनात बसता यावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सी एस आर निधीतून वाहन उपलब्ध करून दिले.
आज त्या वाहनाचे अवलोकन व विशेष मुलांच्या ह्या केंद्रास भेट देण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळ काढला. त्यांच्या समवेत भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रा फाउंडेशन च्या सौ.प्राजक्ता कोळपकर, श्रीप्रसाद देशमुख, मंदार बलकवडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी विशेष मुलांनी ना. चंद्रकांतदादांचा वाढदिवस साजरा केला, केंद्रातील एका श्रद्धा नावाच्या व्हील चेयर वरील सेरेब्रल पालसी असलेल्या मुलीने जोरजोरात “बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये, तुम जियो हजारो साल, ये मेरी हैं आरजू ” हे गाणे गायले आणि मग सर्वच विशेष मुला मुलींनी एकसुरात दादांना शुभेच्छा दिल्या…. कोणी दादांचा हात हातात घेत होतं, कोणी सॅल्यूट करत होते, कोणी दादांना औक्षण करत होतं, टिळा लावत होतं, अत्यंत भावनिक आणि शब्दशः प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असा हा आनंद सोहोळा होता.
ह्या मुलांना केवळ सहानुभूती ची नाही तर सक्षमतेने जगविण्याची जिद्द प्रा फाउंडेशन च्या प्राजक्ता कोळपकर यांनी बोलून दाखवली तसेच ह्या विशेष मुलांच्या “आईला एक कडक सॅल्यूट, जी आपल्या विशेष मुलासाठी श्वास अर्पण करते, तिलाही स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे हा संदेश आम्ही रुजवतोय ” असेही त्या म्हणाल्या. सध्या संस्थेत असलेल्या ह्या 41 मुलांचा सांभाळ करतानाचे अग्निदिव्य ही त्यांनी कथन केले. त्यांच्या ह्या कार्याप्रतीची निष्ठा आणि तळमळ बघून यापुढील कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.