मराठी भाषा म्हणजे संस्कृती; ती शिकणे आणि जपणे गरजेचे — कृपाशंकर सिंह

पुणे : “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली संस्कृती आहे. आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्यातील भाषा जर शिकली नाही, तर त्या भूमीची संस्कृती समजणार नाही. मराठी आपण शिकलीच पाहिजे, जपलीच पाहिजे,” असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी केले.

पुण्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल गुरुवारी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी खासदार रजनीताई पाटील, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी, अभिनेत्री स्मिता गोंदकर, ‘कोहिनूर ग्रुप’चे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेश शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाला.

कृपाशंकर सिंह म्हणाले, “पुण्यात आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधील लघुपट समाजप्रबोधन करणारे आहेत. असा महोत्सव मुंबईतदेखील झाला पाहिजे. तरुणाई समाजासाठी महत्त्वाचे संदेश देत आहे, हे कौतुकास्पद आहे.”

खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या, “या महोत्सवातील लघुपट हृदयाला भिडणारे आणि समाजाचे डोळे उघडणारे आहेत. ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’चे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. असा प्रबोधनपर महोत्सव दिल्लीमध्येही घेण्याचा मानस आहे.” त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने ‘पुनीत बालन ग्रुप’ गणेशोत्सव साजरा करीत असल्याचेही नमूद केले.

प्रास्ताविक संगीता तिवारी यांनी केले. त्यांनी सांगितले की, महोत्सवात ३०० हून अधिक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांनी सहभाग घेतला होता. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हा महोत्सवाचा मुख्य आधार होता. लघुपटांचे परीक्षण सेन दाभोलकर, झहीर दरबार, विशाल गोरे आणि सचिन दानाई यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले, तर पुनमीत तिवारी यांनी आभार मानले.

पारितोषिक विजेते :
दीड ते तीन मिनिटे गट : पहिले — संदेश वीर, दुसरे — अर्थव शालीग्राम, तिसरे — अक्षय वसकर
तीन ते चार मिनिटे गट : पहिले — तेजस पाटील, दुसरे — अक्षय वसकर, तिसरे — अक्षय भांडवलकर; विशेष — शुभम सांची
पाच ते सात मिनिटे गट : पहिले — स्वप्निल गायकवाड, दुसरे — मेधा गोखले, तिसरे — अभिताभ भवर

रील गट : पहिले व दुसरे — व्यंकटेश सुंभे

See also  ‘नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’ – राज्यपाल रमेश बैस