मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी पुण्यात शांतता रॅली

पुणे : मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत  रविवारी पुण्यात शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठीची पिंपरी-चिंचवड शहरातील तयारी पूर्ण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील समाज बांधवांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे-पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. मराठा समाजात जनजागृती व्हावी व समाजासमाजात शांतता निर्माण व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा बुधवार दिनांक 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू आहे.सोलापूर, सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यांचा दौरा करून जरांगे पाटील रविवारी ( दि. 11) रोजी पुण्यात येत आहेत.या दौऱ्याच्या नियोजनासाठी पुणे जिल्ह्य़ातील हजारो कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो मराठा सेवक नियोजन करत असून यासाठी शहरात विविध ठिकाणी अनेक बैठका गेल्या पाच दिवसात पार पडल्या असून मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.जरांगे पाटील रविवारी सातारा दौरा संपवून सकाळी अकरा वाजता स्वारगेट जवळील सारसबाग येथे येणार आहेत. सारसबाग येथून लाखो बांधवांसह सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती व महा भव्य शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली सारसबाग, बाजीराव रोड,अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे जंगली महाराज रोड,बालगंधर्व चौक येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन मार्गे रॅली अलका टॉकीज चौकात येणार आहे.

या ठिकाणी जाहीर सभा होणार असून मनोज जरांगे-पाटील उपस्थित लाखो बांधवांना संबोधित करणार आहेत. याच ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून लाखो मराठा बांधव सहकुटुंब सहभागी होणार आहेत. यासाठी शहरातील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डांगे चौक,भोसरी पी.एम.टी.चौक, कासारवाडी चौकातून सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा बांधव चारचाकी व दुचाकी वरून पुण्याकडे रवाना होणार आहेत.काळेवाडी,थेरगाव, वाकड,रहाटणी परिसरातील हजारो बांधव डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी दहा वाजता औंध मार्गे  पुण्याकडे दुचाकी रॅलीने रवाना होणार आहेत.

थेरगाव चिंचवड विभागाचे नियोजन सकल मराठा समाजाचे समन्वयक सतिश काळे, प्रकाश जाधव, वैभव जाधव,नकुल भोईर, वाल्मिक माने,सर्जेराव पाटील, लहू लांडगे,सचिन बारणे, रावसाहेब गंगाधरे,रमेश कदम व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.शहरातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  कंत्राटी कामगार प्रथा आणि चार नव्या श्रमसंहिता विरोधी कामगार संघटनांचा आक्रोश मेळावा - अजित अभ्यंकर