पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्टच्या वतीने ‘तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा शितोळे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, डॉ. शैलेश गुजर, महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होते.
तुळशीबाग उत्सव मंडपात कार्यक्रम झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, लीना मेहंदळे, अपर्णा आपटे, प्राची महाडकर अगरवाल, मंजुश्री खर्डेकर, रिंकल गायकवाड यांचा सन्मान कार्यक्रमात झाला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, तुळशीबाग गणपतीची प्रतिमा असे सन्मानाचे स्वरूप होते.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात काम कशा पद्धतीने करायचे हे महिला त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून देतात. राजकीय, शासकीय, सामाजिक अश्या सर्व क्षेत्रात महिला आपली मेहनत आणि वचनबद्धतेने आपला ठसा उमटवितात. मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळात आजही सामाजिक बांधिलकी जपत लोकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे उत्सवाचा हेतू टिकला आहे. खऱ्या अर्थाने समाजाभिमुख असे हे मंडळ आहे.
नीलिमा शितोळे म्हणाल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाचे तुळशीबाग गणपती हे मध्य आहे. संस्कृती जपण्याचा प्रयत्न महिला करतात आणि आपला समृद्ध वारसा पुढे नेतात. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय हे कौतुकास्पद आहे.
नितीन पंडित म्हणाले, तुळशीबाग आणि महिला यांचे अतूट नाते आहे त्या अनुषंगाने गणेशोत्सवात ‘एक दिवस महिलांचा’ उपक्रम मंडळातर्फे केला जातो. या दिवशी उत्सवाचे संपूर्ण व्यवस्थापन महिला सदस्या करतात. या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुनंदा इप्ते यांनी आभार मानले.
घर ताज्या बातम्या मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : खासदार मेधा...